Thursday, January 15, 2009

माझे जाधव सर

आपल्या आयुष्यात अनेक मार्गदर्शक/शिक्षक असतात। पण थोडेच जण असे काही भक्कम असतात की कितीही झाले तरी दीपस्तंभाप्रमाने सतत ध्येयाची/मार्गाची आठवण करून देतात. माझ्या आजपर्यंतच्या प्रवासातील एक महत्वाची व्यक्ती, ज्यामुळे माझ्या सरळ धोपट अभ्यासाला चांगला मार्ग मिळाला, ती व्यक्ती म्हणजे सोलापूरचे 'जाधव सर’.

माझ्या मोठ्या भावाची ७वी। या वयातल्या मुलांसाठी सर्वात मोठी परीक्षा म्हणजे ' ७वी स्कॉलरशिप'. पप्पांनी आधीच 'जाधव सरांची' भेट घेउन अमेयाचा प्रवेश पक्का केलेला. क्लासचा पहिला दिवस अणि अमेयाला सर खूप आवडून गेले. तो मधुर शांत स्वर, मुलांना त्यांच्या वयाप्रमाने मुद्दा सोदाहरण समजावून सांगणे, चांगली अभ्यासाची पद्धत लावणे, पाठांतर, स्मरणशक्ती जोपसणे, उत्तम वाचन लेखन, उत्तम लोकांचे विचार अशा एक काय अनेक गोष्टी सांगता येतील सरंबददल!

ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी या परिक्षेची सर्वसाधारण ओळख करून देतो। ही परीक्षा म्हणजे ७वीच्या मुलासाठी डोक्यावरून पाणी. यात फक्त ३ विषय: भाषा, गणित आणि बौद्धिक बुद्दिमत्ता चाचणी.
भाषा हा विषय मराठी,तिची सुंदरता अणि तिचे भाषा विशेष म्हणजेच वाक्यप्रचार, म्हणी आणि सामान-विरुद्ध अर्थ वगैरे वगैरे यांची परीक्षा। यात उत्तम गुण मिळवणारा मुलगा पुढे जाउन नाव काढणार यात वादच नाही! गणित ही फक्त 'ड गट' सोडवण्याची परीक्षा, ते पण फक्त १।२५ मिनिटात १ गणित! यात ला.सा.वि. म.सा.वि, काळ काम वेग, द्वैराशिके-त्रैराशिके, नफा-तोटा, गुण्णोत्तर, सरळव्याज-चक्रवाढव्याज, शेकडेवारी, वगैरे वगैरे सामिल होते. बौद्धिक बुद्दिमत्ता चाचणीमध्ये कूट प्रश्न, सांख्यिक चौकोन, आकृतीतील चौरस-आयतांची संख्या मोजणे, परस्पर संबन्ध शोधणे, पुढील क्रम शोधणे, विजोड संख्या/अक्षर शोधणे, संख्या/अक्षर मनोरा, वर-खाली क्रम ठरवणे आणि त्या आधारित प्रश्नांची उत्तरे देणे वगैरे वगैरे समाविष्ट होते.

जाधव सरांचा एक पेटंट ड्रेस कोड होता तो म्हणजे पांढरा स्वच्छ धुवून इस्त्री केलेला सदरा आणी विजार। त्या शर्टाच्या खिशाला एक चकचकीत निळं शाईचं पेन. त्या पेनाने सर फक्त सही किंवा शेरा लिहित. आकडेमोड किंवा उत्तर लिहायचे असल्यास सर समोरच्याचे पेन मागुन घेत. त्यामुळे सरांच्या पेनाची मोहोर उठवून घेण्यात मुलांची चढाओढ लागे. सरांच्या वर्गात एकच नियम होता तो म्हणजे काही येत नसेल, करायचे नसेल तर शांत बसणे. उगीच दंगा घालून बाकीच्यांचा वेळ वाया नाही घालावयाचा! अशी मुले सरांपासुन लांब अगदी शेवटच्या बाकावर बसत. मग सरांचे लक्ष तिकडे गेल्यावर काही तरी करण्याचा आव आणत. मग सर आम्हाला अवघड गणीत घालून त्यांचा समाचार घ्यायला जात. मधुनच धपाट्याचा आवाज आला की ओळखायचं चोराला शिक्षा झाली. सगळा वर्ग मग मागे वळून वळून बघायचा. पण सरांनी कधी खडू नाही मारले किंवा बाहेर नाही काढले. खूपच झाले तर ते 'चितळे मास्तरांसारखे' खांदे दाबायचे! पण हे सगळे नियम लागु व्हायचे ते फक्त मुलांना! सरांनी मुलींना शिक्षा केलेली मला तरी आठवत नाही. फार तर एकीची जागा बदलून मागच्या ओळीत दुसरीच्याजवळ बसवायचे!

मग काही वर्षानी मी, पप्पा आणि अमेय असे तिघे गेलो सरांकडे, माझा प्रवेश घ्यायला। मी तिथे भाषा शिकलो, गणित शिकलो, अनेक चाचणी परीक्षा दिल्या. शुद्ध मराठी म्हणजे अग्निरथ आवक-जावक नियामक ताम्र पत्रिका, ती कशाशी खातात ते कळले! खूप चांगले चांगले मित्र मिळवले। कूट प्रश्न, बौद्धिक कसरती, २ ते १९ पर्यंतच्या कसोट्या शिकलो! आजवर जे काही यश मिळवू शकलो आहे त्याच्या मुळाशी जाधव सरांनी घातलेला भक्कम पाया हेच कारण आहे.

मुळातच सर शिकवायचे खूप मनापासून। त्या शिकण्याच्या वयात अशी कोणी व्यक्ति आदर्श म्हणुन आसपास असणे हेच मोठे भाग्य! सर म्युन्सिपालटिच्या शाळेत शिक्षक आणि हेडमास्टर अशा दुहेरी जबाबदारया पार पाडत! सरांनी इतरांकडे कधीच दुर्लक्ष्य केल्याचे मला तरी आठवत नाही. ज्यावेळी सर निवडक हुशार मुलांना शाळेत आणि घरी बोलवून त्यांना विशेष प्रश्नपत्रिका सोडवायला लावत, जास्तीची तयारी म्हणुन (आजकाल यालाच स्पेशल कोचिंग क्लास असे गोंडस नाव मिळालय!); त्याचवेळी शाळेतून जी कोणी ७वीचि मुले असत त्यांना पण बोलवून आमच्या सोबत पेपर सोडवण्यास देत. कारण काय तर त्यांना पण अभ्यासाची गोडी लागावी. त्यात पण अनेक चांगली मुले होती ज्यांना परिस्थितिमुळे खुप शिकणे शक्य होणार नव्हते, सर त्यांना स्वतः मदत देत.

सरांना कोणताच विषय व्यर्ज नव्हता पण सरांचा आवडता विषय होता ’गणित’। वैदिक गणिताशी ओळख झाली ती सरांमुळेच! सर तोंडी आकडेमोड अशी काही करायचे की समोरच्याने तोंडात बोटे घातली पाहिजेत! तीन तीन चार चार आकडी गुणाकार, भागाकार सर तोंडी सांगायचे! संख्येच्या वर्गाची व घनाची सोपी पद्धत सरांमुळेच कळली! जेव्हा आम्ही सरांच्या शाळेत जात असू तेव्हा त्या जेमतेम चार-पाच खोल्यांच्या शाळेत इतर वर्ग पण चालू असायचे. मग ज्या वर्गात कमी गर्दी असेल तिथे आमचा अभ्यास चालायचा. काही वेळाने तास बदलला आणी शिक्षक येणार नसले तर सर तास घ्यायचे. त्यावेळी सर इतिहास आणि भूगोलाचे प्रश्न विचारायचे! खूप कमी वेळेला मी सरांना विज्ञान शिकवतांना पाहिलयं. काही वेळा आम्हाला पण त्या वर्गात सामील व्ह्यायची परवानगी मिळायची, मग काय! प्रत्येक प्रश्नाला हात वर! काही काही वेळा सर शुद्धलेखन घालत. मग गणिताच्या वहीत मराठीचा धडा आणि बुद्दिमत्तेच्या वहीत भारताचा नकाशा असे अनेक प्रकार घडत!थोड्या थोड्या वेळाने सर बाहेर चक्कर मारून यायचे. शाळेतून पळून जाणारी, बाहेर भटकणारी मुले आणि त्यांचे मित्र हे सरांचे मुख्य ’लक्ष्य’! अनेकदा शेजारच्या शाळेतील उनाड मुलांना सरांनी पकडून २ तास तरी वर्गात बसवलयं!

माझा भाऊ ७वीच्या स्कॉलरशिप मध्ये उत्तम गुणांनी चांगल्या ८व्या क्रमांकाने पास झाला. यथावकाशाने मी पण त्याच्या पावलावर पाउल ठेवून १०व्या नंबरात पास झालो. सरांना नमस्कार करायला गेल्यावर सर नेहमीप्रमाणे म्हणाले "यशस्वी भव:"

1 comment:

Sanish said...

wonderful article.. shaletale divas athavale :)
aani ajunahi evadhi changali marathi lihita yete.. layi bhari!